Monday, November 25, 2013

मस्त झोपलाय देश, झोप त्याची मोडू नका!

राम-रहीम विवाद, सत्तेसाठी
धर्मापरे बोले त्याच्या डोकी काठी..
सीमेवर गोळीबार, बॉम्ब इथे फोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll

बेरोजगारी-लाचारीला NREGA ने सारा
आत्महत्या-उपासमारीला Food Bill चारा
परप्रांतीय येणारच, उगाच आकांडतांडव करू नका 
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll

भ्रष्टाचार पसरतोय.. पसरु दे
रुपया घसरतोय.. घसरु दे
नपुंसकत्वाचे पांघरुण अंगावरून ओढू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll 

लुटालूट, बलात्कार.. बघूच नका
रांगेमध्ये उभे रहा.. बोलूच नका
नेत्यांचेच पाय धरा, कॉलर मात्र धरू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll 

टीवी वाल्यांसारखे निरर्थक बोलत राहा, डोलत राहा..
आपले मत जातीने-पैशाने तोलत राहा..
मतदान नका करू, पण हक्क सांगणे सोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll 

खायला नसले चालेल.. पुतळे बांधा
नाड्या हरवल्या तर.. सूतळे बांधा
असे हवे, तसे नको, उगाच चर्चा झोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll 

पाणी नसेल नळाला तरी होळी साजरी करा 
वाहतूक सुरळीत आहे? हंडी / विसर्जन करा 
खोकून, गुदमरून मेलात तरी चालेल पण
फटाके फोडण्याचा हट्ट सोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll 

तेच लिहिणार भाग्य.. वाईट काय
पीत रहा दिवस आणि.. नाईट काय
सारेच धुंदीत आहेत ग्लास त्यांचे फोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll 

गांधी रस्ता खड्ड्यात.. चालूच नका
देशसेवा बाता आता.. बोलूच नका
मरणाचीच वाट पहा उगाच राष्ट्र जोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll 

- दिग्विजय देसाई

(शंकर देव यांच्या मूळ कवितेत बरेच बदल करून तीन नवीन अंतरे जोडलेले आहेत)

No comments: